www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेहमीच गोंधळामुळे चर्चेत असतं. त्यातच आता विद्यापीठावर काही प्राध्यापकांना गाईडशिप दिल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलीय.
दोन वर्षांपूर्वी विद्यापीठानं ५१ प्राध्यापकांना गाईडशिप दिली होती. मात्र, ही गाईडशिप देताना नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्यावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर कुलगुरूंनी प्राध्यापक मोहेकर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. या अहवालानुसार ५१ पैकी १० प्राध्यापक निकषात बसले तर उर्वरीत ४० जण मात्र अपात्र ठरलेय. त्यामुळे त्यांची गाईडशिप रद्द करण्यात आली आहे. या अहवालानुसार त्यांची गाईडशिपच बोगस ठरलीय.
जर हे प्राध्यापक अपात्र होतेच तर त्यांना विद्यापीठानं गाईडशिप दिलीच कशी? असा सवाल आता उपस्थित होतोय. विद्यापीठाच्या समितीनं या प्राध्यापकांना गाईडशिप दिली होती त्या समितीवर आता कारवाई होणार का? असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकतोय. तर ज्या विद्यार्थ्यांनी या अपात्र गाईड्सकडे नोंदणी केली होती, त्यांच्या नुकसानीचं काय? असा सवालही आता उपस्थित होतोय. या सगळ्यावर आता कारवाईची मागणी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.