कल्याण शहराची ओळख एक ऐतिहासिक शहर अशी आहे. सुभेदार वाडा, दुर्गाडी किल्ला ही स्थळं साडे तिनशे वर्षाच्या कालखंडाची साक्षीदार आहेत. कल्याण गायन समाजाला देखील दीर्घ परंपरेचा भरजरी वारसा लाभला आहे. गायन समाज दरवर्षी देवगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करतं. यंदा देवगंधर्व संगीत महोत्सवाची दशक पूर्ती साजरी करण्यात येणार आहे. देशभरातील शास्त्रिय संगीतातील दिग्गजांचे सुश्राव्य गायन, वादनाच्या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन कल्याण गायन समाज दरवर्षी करतं.
यंदाही ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जसरंगी कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकराचे गाणं कल्याणकरांना ऐकण्याचे भाग्य लाभणार आहे. तर दुसऱ्या दिवशी त्रिलोकीमध्ये त्रिलोक गुर्टू यांचे परकशन वादन आणि पं.रोणू मुजुमदार यांचे बासरी वादनाचा कार्यक्रम आहे. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सकाळी संगीत साठेंचे भरतनाट्यम आणि स्मिता परांडेकरांचे कथ्थक नृत्याचे सादरीकरण तसंच कला रामनाथांचे व्हायोलीन आणि आदित्य कल्याणपूरांचे तबला वादन असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आहे. महोत्सवाची सांगता बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार असल्याने तो कळसअध्याय ठरेल यात काहीच शंका नसावी.