मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार

राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षांत केवळ 0.1 टक्के इतकीच वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर पलटवार केलाय.. दुष्काळानं राज्यातली जनता होरपळलेली असताना, आघाडीचे नेते मात्र राजकारणातच दंग असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Updated: May 5, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षांत केवळ 0.1 टक्के इतकीच वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर पलटवार केलाय.. दुष्काळानं राज्यातली जनता होरपळलेली असताना, आघाडीचे नेते मात्र राजकारणातच दंग असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

राज्यात 1971 सारखीच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय.. सुमारे 11 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, चारा याची गंभीर परिस्थिती आहे.. मुख्यमंत्र्यांपासून ते राहुल गांधींपर्यंत आणि पवारांपासून ते केंद्रीय कृषि खात्याच्या अधिका-यांच्या दौ-यानंतरही दुष्काळी भागाला न्याय मिळालेलाच नाही.. अशातच या दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरुपी योजनांची किती बोंब आहे, हे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलंय.

 

- राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षांत केवळ 0.1 टक्केच वाढ झाली आहे.

 - देशात 45 टक्के शेतजमीन ओलिताखाली आली असताना महाराष्ट्राची क्षमता केवळ 17.9 टक्केच आहे...

 - इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेशात 46%, कर्नाटकात 31%, गुजरातमध्ये 42% क्षेत्र सिंचनाखाली मात्र, त्यामानाने महाराष्ट्र कोरडाच    

 - सध्या राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधली ६२०१ गावं टंचाईग्रस्त आहेत.

 

 

महाराष्ट्र कोरडाच  असल्याचे  हे विदारक चित्र पाहता, अखेर मुख्यमंत्र्यांना जलसंपदा खात्याच्या 10 वर्षांच्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची सूचना करावी लागली आहे. राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही आकडेवारी जाहीर केल्याचीही चर्चा आहे... गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात कृषीमंत्रीपदी शरद पवार, तर राज्यात जलसंपदा विभाग राष्ट्रवादीकडे आहे.

 

 

दुष्काळावरुन राज्यपालांवर टीका करत, पवारांनी पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशेषाचं उट्टं काढलं होतं. तेव्हापासून दुष्काळाचं खापर एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आघाडीतल्या दोन्ही पक्षांकडून होताना दिसतोय. सिंचनावर कागदोपत्री कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात चित्र भयाणच दिसतंय... कधी नव्हे ते मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढण्याच्या तयारीत आले असताना आता राजकारणापायी त्यांचं पाऊल मागे न पडो, म्हणजे झालं... कारण, ही श्वेतपत्रिका जनतेच्या हिताचीच ठरणार आहे.

 

 

दरम्यान,  दुसरीकडं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना मात्र सिंचनक्षेत्रात केवळ 0.1 टक्के वाढ झालीये, हा दावा मान्य नाहीये. गेल्या 10 वर्षांत सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचं त्यांचं म्हणणय. यासंबंधात मुख्यमंत्र्यांशीही फोनवर चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलय. एकूणच या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपलीय.