धावपटू ब्लेकला 'आयपीएल'चे डोहाळे...

‘लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये धावण्यात रौप्यपदक पटकावल्यानंतर उसेन बोल्टला पुन्हा क्रिकेटचे डोहाळे लागलेत. आपल्याला आयपीएलमध्ये खेळायचंय, अशी इच्छा आता त्यानं व्यक्त केलीय. इतकंच नाही तर सुपरफास्ट भारताचा गोलंदाज झहीर खानपेक्षाही आपण वेगानं बॉलिंग करू शकतो, असंही ब्लेकनं म्हटलंय.

Updated: Aug 9, 2012, 12:33 AM IST

www.24taas.com, लंडन 

‘लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये धावण्यात रौप्यपदक पटकावल्यानंतर योहान ब्लेकला पुन्हा क्रिकेटचे डोहाळे लागलेत. आपल्याला आयपीएलमध्ये खेळायचंय, अशी इच्छा आता त्यानं व्यक्त केलीय. इतकंच नाही तर सुपरफास्ट भारताचा गोलंदाज झहीर खानपेक्षाही आपण वेगानं बॉलिंग करू शकतो, असंही ब्लेकनं म्हटलंय.

 

योहान ब्लेकनं एक ‘क्रिकेटपटू’ म्हणून आपल्या कारकीर्दीला केली होती. २६ डिसेंबर १९८९ मध्ये जमैकामध्ये जन्मलेला ब्लेक ‘किंगस्टन क्रिकेट क्लब’कडून क्रिकेट खेळला होता. बॉलिंग करताना त्याचा धावण्याचा वेग पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याला धावपटू होण्याचा सल्ला दिला अन् ब्लेकनंही तो अंमलात आणला. ‘लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जमैकाच्या उसेन बोल्टनं सुवर्णपदक पटकावलं तर जमैकाच्याच योहान ब्लेकने या शर्यतीत रौप्यपदकावर ताबा प्रस्थापित केला.

 

पण, अजूनही कुठंतरी ब्लेकच्या मनात क्रिकेटविषयी उत्सुकता आहेच. विंडीजचा क्रिकेटमधील सुपरस्टर ब्रायन लारा व ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हे त्याचे आवडते क्रिकेटपटू आहेत. यंग विराट कोहलीनंही त्याला तितकंच प्रभावित केलंय. ९.७५ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत रौप्यपदक पटकावल्यानंतर ब्लेक म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये खेळायचं आहे. त्यासाठी मी कसून तयारीसुद्धा करतोय. मी क्रिकेटचा फार मोठा फॅन आहे’ असं ब्लेकनं म्हटलंय. याचबरोबर ‘मी उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. बॉलिंगमध्ये मी भारताच्या झहीर खानपेक्षाही अधिक वेगानं बॉलिंग करू शकतो’ असा दावा करतानाच आपण पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यानं दाखवून दिलंय.

 

.