www.24taas.com,नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झालाय. त्याच्या खासदारकीवर स्थगिती आणण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय. स्थगिती आणण्यास नकार दिला असला तरी सचिनला खासदारकी कोणत्या निकषावर देण्यात आली याचा खुलासा करण्याचे आदेश मात्र कोर्टाने दिले आहेत.
याबाबत एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या नामवंत व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली जाते असं घटनेच्या कलम ८० अन्वये स्पष्ट केल्याचं याचिकाकर्ते रामगोपाल सिसौदिया याचं म्हणणं आहे. असं असताना सचिनला खासदारकी कशी दिली याचं उत्तर कोर्टानं ४ जुलैपर्यंत उत्तर मागवलंय.
राष्ट्रपतींकडून नियुक्ती केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींचा खासदारकी दिली जाऊ शकत नाही असा याचिकाकर्त्याचा दावा आहे.
उच्च न्यायालयाने सरकारला विचारलंय की, कोणत्या निकषांच्या आधारे सचिनला खासदारकी देण्यात आली आहे. या विषयीच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी सरकारला पाच जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत सचिनला खासदारकीची शपथ घेण्यापासून कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लवकरच सचिनही राज्यसभेचा खासदार म्हणून शपथ घेण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन १८ तारखेला राज्यसभा खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे.