www.24taas.com, ऍडलेड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे लढत 'टाय' झाली, पण श्रीलंकेचा बॉलर लसिथ मलिंगा याने ३०व्या षटकात सहाऐवजी पाच चेंडू टाकल्यामुळे भारतीय संघाची विजयाची संधी थोडक्यात हुकली असल्याचं म्हटलं जात आहे. तो सहावा बॉल खेळायला मिळाला असता, तर टीम इंडिया ही लढत जिंकता आली असती, असेही मत व्यक्त केले जात आहे. मलिंगाने टाकलेल्या ३०व्या षटकात फक्त पाच बॉल्स झाल्यानंतर अंपायरने ओव्हर पूर्ण झाल्याची घोषणा केली. त्या पाच बॉल्समध्ये भारताला ९ धावा मिळाल्या होत्या.
महेंद्रसिंग ढोणीने पाचव्या चेंडूवर एक धावही घेतली होती. जर सहावा चेंडू खेळला गेला असता आणि भारताला एक धाव मिळाली असती तर टीम इंडिया जिंकली असती.सायमन फ्राय व निजेल लाँग हे अंपायर म्हणून या सामन्यासाठी मैदानावर होते. थर्ड अंपायर म्हणून ब्रुस ऑक्झेमफर्ड हे जबाबदारी पाहात होते. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, हे प्रकरण अधिक ताणण्यात त्याला रस नव्हता.
'झालेल्या गोष्टीवर आता आरडाओरडा करून काय मिळणार? पण पुन्हा अशी चूक पुन्हा होऊ नये. अशी चूक यापूर्वीही झालेली आहे. आम्हाला एक ओव्हर टाकण्यात आली होती आणि बॉलर्सच्या बाजूही बदलल्या होत्या. पण थर्नीड अंपायरने हस्तक्षेप करत त्या षटकातील राहिलेला एक बॉल टाकण्यास सांगितलं. मात्र यावेळी ते झाले नाही. का ते माहीत नाही? पण आता काहीही होऊ शकत नाही.' असं ढोणी म्हणाला.