इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच लॉर्डस टेस्टमध्ये झहीर खानला दुखापत झाली. आणि त्याला त्यानंतर इंग्लंड दौरा तर मुकावा लागला. शिवाय भारतातील इंग्लंड विरुद्धची वन-डे सीरिज आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट आणि वन-डे सीरिजही मुकावी लागली होती. मात्र रणजीमध्ये मुंबईकडून खेळतांना झहीरनं आपण पूर्णपणे फिट असल्याच दाखवून दिलं. त्यानं ओऱीसा आणि सौराष्टविरुद्ध ४० ते ४५ ओव्हर्स बॉलिंग केली. त्याला फारशा विकेट्स मिळाल्या नसल्या तरी त्यानं मोठ्या स्पेलमध्ये बॉलिंग केली आहे आणि याचा फायदा त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये होणार आहे. झहीरनं मी पूर्णपणे फिट असल्याचही स्पष्ट केलं आहे.
"ऑस्ट्रेलिया दौरा खूप महत्त्वाचा आहे. या दौ-यामध्ये माझ्याकडून क्रिकेटप्रेमींच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रणजी मॅचेसमध्ये बॉलिंगचा चांगला सराव झाला आहे. आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहातोय." असं झहीर खान म्हणाला.
झहीरनं टीम इंडियाच्या विजयात नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताची भिस्त त्याच्यावरच असणार आहे. या दौऱ्यामध्ये तो बॉलर्समध्ये सर्वात सिनियर आहे. आता त्याला युवा बॉलर्सच्या साथीनं बॉलिंग करायची आहे. त्यामुळेच झहीरचा अनुभव भारताला या दौऱ्यामध्ये विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असणार आहे. झहीरच्या स्विंग बॉलिंगचा धोका कांगारु बॅट्समेनना असणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या नेहमीच फास्ट बॉलर्सना साथ देतात. त्यामुळे याचा मोठा फायदा त्याला या दौऱ्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन धोनीचं हे ट्रम्पकार्ड कितपत यशस्वी ठरतं याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.