रणनीती कामी: सेमीफायनलमध्ये जर्मनी

२००८ ची फायनलिस्ट असलेल्या जर्मनीनं युरो कपच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. जर्मनीच्या टीमनं ग्रीसचा ४-२ नं पराभव केलाय. जोकोमी लो यांच्या अफलातून रणनीतीच्या जोरावर जर्मनीच्या टीमला हा विजय साकारता आला.

Updated: Jun 23, 2012, 09:05 AM IST

www.24taa.com, डान्स्क, पोलंड

२००८ ची फायनलिस्ट असलेल्या जर्मनीनं युरो कपच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. जर्मनीच्या टीमनं ग्रीसचा ४-२ नं पराभव केलाय. जोकोमी लो यांच्या अफलातून रणनीतीच्या जोरावर जर्मनीच्या टीमला हा विजय साकारता आला. आता त्यांचा सेमी फायनलचा मुकाबला इंग्लंड आणि इटली यांच्यातील विजेत्या टीमशी होणार आहे.

 

ग्रीसचा ४-२ नं धुव्वा उडवत जर्मनीनं युरोपियन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला. या मॅचमध्ये सेकंड हाफमध्ये केलेल्या शानदार खेळामुळे जर्मनीला ग्रीसला पराभूत करण्यात यश आलं. त्यातच कोच जोकिम लो यांनी आखलेली रणनीतीही भलतीच यशस्वी झाली. क्वार्टर फायनल गाठून देणाऱ्या मारियो गोमेझऐवजी मेन स्ट्रायकर मिरोस्लाव्ह क्लोसाला खेळवण्याचा निर्णय जर्मनीच्या पथ्यावर पडला. क्वार्टर फायनलपर्यंत लाईम लाईटमध्ये नससेल्या फुटबॉलपटूंनी या मॅचमध्ये गोल झळकावत जर्मनीचं सेमी फायनलचं तिकीट निश्चित केलं. ३९ व्या मिनिटाला कॅप्टन फिलीप लामनं गोल करत जर्मनी १-० नं आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये १-० नं आघाडी घेणाऱ्या जोकोमी लोच्या टीमनं सेकंड हाफमध्ये गोलचा धडका लावला. आणि ६१ व्या मिनिटाला सामी कडेरानं गोल करत जर्मनीची आघाडी २-० नं वाढवली. तर ग्रीसकडून ५५ व्या मिनिटाला दिमीत्रीस सालपिजीडीसच्या पासवर जॉर्जियस सामारसनं पहिला गोल करत आपल्या टीमला मॅचमध्ये कमबॅक करून दिला.

 

स्टार स्ट्रायकर मिरोस्लाव्ह क्लोसानं आपल्या नेहमीच्या स्टाईलनं हेडरवर गोल करत जर्मनीला विजयाच्या आणखी समीप नेलं. ७४ व्या मिनिटाला मार्को रुसनं जर्मनीकडून चौथ्या गोलची नोंद केली. मॅच संपायला आवघा एक मिनिट शिल्लक असताना सालपिजीडीसनं पेनल्टीवर गोल केला आणि मॅचची रंगत आणखी वाढवली. मात्र जर्मनीचा बोलबाला असलेल्या या मॅचमध्ये ग्रीसचं काहीच चाललं नाही. आणि त्यांना क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. २०१२ च्या युरो कपमध्ये आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जर्मनीच्या टीमनं आपली विजयाची मालिका कायम राखली आहे. आता सेमी फायनलमध्येही बाजी मारत त्यांची टीम फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा प्रवेश करण्यास आतूर असेल.

 

.