युरो कप २०१२: चेक रिपब्लिक विजयी

विजयाच्या शोधात असणा-या चेक रिपब्लिकने अखेर युरो चॅम्पियन असणा-या ग्रीसचा २-१ ने पराभव करताना युरो कप टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद केली. चेक रिपब्लिकने पहिल्या सहा मिनिटांतच दोन गोल्स झळकावत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. ग्रीसतर्फे गेकासने एकमेव गोल झळकावला. चेक रिपब्लिकची लीगमधील अखेरची मॅच यजमान पोलंडशी होणार आहे.

Updated: Jun 13, 2012, 03:09 PM IST

www.24taas.com, रॉकलॉ

 

विजयाच्या शोधात असणा-या चेक रिपब्लिकने अखेर युरो चॅम्पियन असणा-या ग्रीसचा २-१ ने पराभव करताना युरो कप टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद केली. चेक रिपब्लिकने पहिल्या सहा मिनिटांतच दोन गोल्स झळकावत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. ग्रीसतर्फे गेकासने एकमेव गोल झळकावला. चेक रिपब्लिकची लीगमधील अखेरची मॅच यजमान पोलंडशी होणार आहे.

 

रॉकलॉ येथे झालेल्या ग्रीसविरूद्ध लीग मॅचमध्ये चेक रिपब्लिकने २ विरूद्ध १ असा विजय मिळवत युरो कपमधील आपलं आव्हान जिवंत राखलंय. हजारो फॅन्सच्या उपस्थित ग्रीसविरूद्ध खेळण्याकरता उतरलेल्या चेक रिपब्लिकला पहिल्या मॅचमध्ये रशियाकडून ४-१ असा सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे युरो कप टूर्नामेंटमधील आपलं आव्हान कायम राखण्याकरता आणि पुढील स्टेजमध्ये एन्ट्री करण्याकरता चेक रिपब्लिकला ग्रीसविरूद्ध मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं. विजयाच्या निर्धाराने खेळणा-या चेकने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ग्रीसच्या डिफेंसवर दबाव टाकायला सुरूवात केली. कोस्टास कटसौरानिस आणि क्रायकोस पापाडोपोलस या ग्रीसच्या डिफेंडर्सना चेकचं आक्रमण थोपवण्यात अपयश आलं...चेकने याच संधीचा फायदा उचलत पहिल्या सहा मिनिटांतच दोन गोल्सची नोंद केली. मॅचच्या तिस-याच मिनिटाला इरी युराचेकने थॉमस हब्शमनच्या पासवर ग्रीस गोलकीपरला चकवत पहिला गोल केला आणि चेकला १-० ने आघाडी मिळवून दिली. तर लगोलग सहाव्या मिनिटाला गेब्रेसेलसीसने ग्रीस गोलकीपर चाखीयासला चकवत बॉल गोलपोस्टजवळ मारला. याच संधीचा फायदा उचलत वॅक्लाव पिलरने बॉल गोलमध्ये ढकलत चेककरता दुस-या गोलची नोंद केली. सलग झालेल्या दोन गोल्सच्या आघातात असणा-या ग्रीसला २२व्या मिनिटाला त्यांचा गोलकीपर चाखीयास जखमी झाल्याने आणखी एक धक्का बसला. पहिल्या सहा मिनिटांतच दोन गोल झाल्याने चेक रिपब्लिकची टीम बिनधास्त होती. त्यांनी पहिल्या हाफमध्ये अनेकदा ग्रीसचा डिफेंस भेदण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्यांना यश मिळालं नाही.

 

मात्र, दुस-या हाफमध्ये ग्रीसने धडाक्यात सुरूवात केली. ५३व्या मिनिटाला गेकासने ग्रीसकरता पहिल्या गोलची नोंद केली. चेक रिपब्लिक गोलकीपर चेकने गडबडीत बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. पण बॉल त्याच्या हातून सुटला आणि सब्स्टीट्यूट म्हणून आलेल्या गेकासने ग्रीसच्या पहिल्या गोलची नोंद केली. अखेर फूल टाईममध्ये चेक रिपब्लिकने २-१ ने विजय मिळवत युरोमधील आपलं आव्हान कायम राखण्यात यश मिळवलं. ओपनिंग मॅचमध्ये पोलंडविरूद्ध बरोबरीत मॅच सोडवणा-या ग्रीसकरता चेक रिपब्लिकविरूद्धचा हा पराभव लीगमधील आव्हान कायम राखण्याच्या आशांवर पाणी फेरणारा ठरू कतो. त्यामुळे ग्रीससमोर आता बलाढ्य रशियाचा मोठ्या गोलफरकाने पराभव करण्याचं आव्हान असणार आहे. जेणेकरून त्यांना पुढील फेरी गाठता येईल.

 

.