रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी

रंगपंचमीचा सण म्हणजे धुळवड होणारच. मात्र रंगांची उधळण होताना या रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण, रासायनिक रंग त्वचेला तसंच डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात.

Updated: Mar 8, 2012, 11:24 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

रंगपंचमीचा सण म्हणजे धुळवड होणारच. मात्र रंगांची उधळण होताना या रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण, रासायनिक रंग त्वचेला तसंच डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात. याशिवाय इतरही विकार होण्याची शक्यता असते.

एशियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसमधील डरमेटोलॉजिस्ट अमित बांगिया यांचं असं म्हणणं आहे की, होळीतील रासायनिक रंगांमुळे त्वचेला खाज सुटणं, जळजळ होणं, त्वचा लाल होणं  किंवा त्वचेची सालपटं निघण्यासारखे विकार उद्भवू शकतात. काहीवेळा त्वचेवर कायमस्वरूपी डागही पडू शकतात. काही ओल्या रंगांत क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे अंधत्व येण्याचीही शक्यता असते. दाट रंग हे काही प्रमाणात विषारी असतात यात इंजिनमध्ये वापरलं जाणारं तेल वापरलं जातं किंवा तत्सम कमी प्रतीचं तेल वापरलं जातं.

 

विशेषज्ञांच्या मते रासायनिक रंगांमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर रासायनिक रंग वापरले जातात, कारण ते स्वस्त आणि बनवायला सोपे असतात. पण, लोकांना या रंगामुळे होणाऱ्या हानीची माहिती नसते. या रंगांच्या तुलनेत खरंतर नैसर्गिक रंग बनवणं फारसं कठीण नाही.

 

पिवळा रंग बनवण्यासाठी हळदीचा वापर करता येऊ शकतो. हिरव्या रंगासाठी मेंदी वापरता येऊ शकते, गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्यांपासून लाल रंग मिळवता येतो.