www.24taas.com, मुंबई
आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही. आकाश टॅब हाळण्याची संधी आता विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयातील वाचनालयात भाड्याने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वात स्वस्त असलेला आकाश टॅबलेटमध्ये अभियांत्रिकी, शास्त्र आणि मानवीय शास्त्र अशा विषयांनुसार व्हिडिओ लेक्चर प्री-लोड करण्यात येणार आहेत.
आकाश देशातील सर्व २२० दशलक्ष शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्याची सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळेच हे निर्धारीत लक्ष्य गाठण्यासाठी आकाश भाड्याने उपलब्ध करुन देण्याचं पाऊल उचलण्यात येणार आहे.
आकाश किती कालावधीसाठी भाड्याने देण्यात येईल ते प्रत्येक महाविद्यालयावर अवलंबून असेल. दरम्यान, आकाश टॅबलेटची निर्माती करणाऱ्या डाटाविंड यंदाच्या वर्षात १५ दशलक्ष टॅबची विक्री करण्याची शक्यता आहे. कंपनीला भारत सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून अल्प किंमतीतील टॅबलेटच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळवली आहे. मंत्रालय यंदाच्या वर्षात विविध कंपन्यांकडून १० दशलक्ष टॅब विकत घेणार आहे.
इजिप्त, थायलंड, पनामा, श्रीलंका आणि ब्राझिल या देशातही टॅबची विक्री करण्याची डाटाविंडची योजना आहे. डाटाविंडच्या आकाश या एण्ड्रोईड टॅबलेटची किंमत फक्त २४९९ रुपये आहे आणि १९९ रुपये पाठवणीचा खर्च आकारला जातो. सध्या आकाशची बॅटरी दीड तास चालू शकते.
आकाशमध्ये सात इंच टच स्क्रीन तसंच २५६ मेगाबाईट रॅम आणि एआरएम ११ प्रोसेसर तसंच एण्ड्रोईड २.२ ऑपरेटिंग सिस्टिम, दोन युएसबी पोर्ट आणि एचडी क्वालिटी व्हिडीओ हे फिचर्स आहेत.