शिक्षणसम्राट मारूती नवलेंची मुजोरी

मारुती नवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवलेंनी त्यांच्या सिंहगड स्प्रिंगडेल ही शाळा पालकांना कसलीही पूर्वसूचना न देता हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हा निर्णय रद्द न केल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

Updated: Mar 5, 2012, 06:07 PM IST

www.24taas.com, पुणे

मारुती नवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवलेंनी त्यांच्या सिंहगड स्प्रिंगडेल ही शाळा पालकांना कसलीही पूर्वसूचना न देता हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हा निर्णय रद्द न केल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

सिंहगड इन्स्टिट्युटच्या मारुती नवलेंची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या नऱ्हे इथल्या कॅम्पसमध्ये सुरू असलेली सिंहगड स्प्रिंगडेल ही पहिली ते दहावी पर्यंतची शाळा नवलेंनी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. पालंकांशी कसलीही चर्चा न करता नवलेंनी फक्त एका परिपत्रकाद्वारे त्यांना शाळेची जागा हलवण्याबाबतचा निर्णय कळवला आहे.

त्यात  पालकांना आंबेगाव आणि वारजे या ठिकाणी जाण्याचे पर्याय दिले आहेत. पालकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. शाळेच्या फी वाढीविरोधात  पालकांनी अनेकदा आंदोलन केलं होतं. तोच राग मनात धरुन पालकांना कोंडीत पकडलं जात असल्याचा आरोप पालक करत आहेत. तर दुसरीकडे सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या प्रशासनानं हे आरोप फेटाळले आहेत.

प्रशासन काहीही सांगत असलं तरी प्राथमिक शाळेऐवजी जर त्याजागी मेडिकल कॉलेज होणार असेल तर फायदा कशात आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळं प्रशासनानं हा निर्णय का घेतला आहे हे स्पष्टच होतं आहे. त्यामुळे अशा बेलगाम झालेल्या संस्थेची मुजोरी थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे.