मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस

संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Updated: Jun 11, 2012, 08:46 AM IST

श्रीनिवास डोंगरे, www.24taas.com, सातारा 

 

संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

बीडमधल्या स्त्री-भ्रूण हत्येच्या प्रकारानंतर राज्यात एकामागून एक धक्कादायक प्रकरणं उघड होत आहेत. असाच एक प्रकार मुख्यमंत्र्याच्या सातारा जिल्ह्यातही घडला आहे. काशीळमधल्या डॉ. सिकंदर शेख यांच्या 'बरकत' या क्लिनिकमध्ये एका महिलेचा गर्भपात करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली, तेंव्हा गर्भपातानंतर अर्भकाला शेतात पुरण्यात आल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे हा डॉक्टरही बोगस असल्याचं उघड झालाय. याप्रकरणी पोलिसांनी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक केली आहे.

 

आरोग्य विभागामार्फत अर्भकाचा शोध घेतला जातोय. असे गर्भपात करण्यासाठी सिंकदर शेख दहा हजार रूपये घ्यायचा. त्याच्या अटकेमुळे आणखीही काही प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. साता-यात ‘लेक लाडकी’ अभियानानं आघाडी घेतली होती. त्यातच हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मात्र तरीही इथं बेकायदेशीररित्या गर्भपात करून अर्भक पुरण्याचा घृणास्पद प्रकार घडलाय. असे प्रकार थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना कठोर शासन होण्याची गरज आहे.