झी २४ तास वेब टीम, पुणे
वाढत्या महागाईने सामान्य नागरिक होरपळत असतानाच, पेट्रोल, वीज दरवाढीपाठोपाठ मध्यरात्रीपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा ‘चटका' बसणार आहे. या दरवाढीमुळे रिक्षासाठी नागरिकांना आता पहिल्या किलोमीटरसाठी पूर्वीप्रमाणे ११, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी नऊऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.
यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी रिक्षाभाडे वाढले होते. त्यानंतर पेट्रोलची दोनदा दरवाढ झाली. परंतु रिक्षाभाडे झाली नव्हती. त्यामुळे रिक्षाभाडे वाढविण्याची मागणी विविध रिक्षाचालक संघटनांकडून केली जात होती. पहिल्या किलोमीटरसाठी १२ किंवा १३, तर पुढील प्रत्येक किलोमीटरला ११ रुपये भाडे करण्याची मागणी केली जात होती.
या मागणीचा विचार करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकी एक रुपयाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे.