पुण्यात स्वाईनचा धोका वाढला

पुण्यात स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू आहे. एका विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अत्यवस्थ असलेले दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, नव्याने ६ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली आहे.

Updated: Mar 17, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू आहे. एका  विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  अत्यवस्थ असलेले दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, नव्याने ६ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी  दिली आहे.

शुभांगी कुलकर्णी (५८, रा. घोरपडी) , अमृता जोशी (१०, रा.  धनकवडी )  या दोघींचा स्वाईनने मृत्यू झाला.  शुभांगी यांना सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही लक्षणे होती. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात त्या दाखल झाल्या. तपासणीत त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.  अमृताला बुधवारी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागताच तातडीने एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये तिला स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

दीप बंगला चौक आणि खराडी येथील शाळेमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून या दोन शाळांची तपासणी करण्यात आली.  सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला शिक्षकांना देण्यात आल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातमी

पुण्यात स्वाईन फ्लूने महिलेचा बळी