झी २४ तास वेब टीम, पुणे
खासगी ट्रॅव्हल्सच्या मुजोरीला लगाम घालण्यासाठी पुण्य़ातल्य़ा सहयोग ट्रस्टनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ट्रॅव्हल्सवर अंकुश लावण्यात सरकार अपयशी ठरलं. त्यामुळं आता ट्रॅव्हल्सच्या मुजोरीविरोधात सामाजिक संस्थांनी हायकोर्टात धाव घेतली.
सणासुदीच्या दिवसात खासगी ट्रव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणारी लूट, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात ही नित्याचीच बाब झाली. ट्रॅव्हल्सवाल्यांच्या या मुजोरीवर लगाम घालण्यासाठी पुण्यातल्या सहयोग ट्रस्टनं हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेसोबत अव्वाच्या सव्वा आकारलेली तिकीटं, प्रवाशांच्या तक्रारीही जोडण्यात आल्यात. शिवाय बुलढाण्याजवळ ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालेल्या भीषण अपघाताचा संदर्भही जोडण्यात आला. सरकार ट्रॅव्हल्सवाल्यांच्या मनमानीला लगाम घालण्यात अपयशी ठरल्यानं आता थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आलेत.
झी 24 तासनं दिवाळीच्या दरम्यान प्रवाशांच्या होणा-या लुटीकडं वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधलं होतं. व्यापक प्रमाणात जनजागृती, कोर्टाच्या आदेशानं सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यास ट्रॅव्हल्सची मनमानीवर अंकुश लावता येईल. अन्यथा प्रवाशांची लूट आणि त्यातही होणारा धोकादायक प्रवास ही स्थिती कायम राहिल.