चारा-पाण्यासाठी पतंगरावांना महिलांचा घेराव!

पाणी आणी चाऱ्याच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम यांना मीरज पूर्व भागातील दुष्काळग्रस्त महिलांनी आज घेराव घातला. कदम यांची गाडी अडवून त्यांना सुमारे अर्धातास घेराव घातला.

Updated: Jan 5, 2012, 06:01 PM IST

www.24taas.com,सांगली
पाणी आणी चाऱ्याच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम यांना  मीरज पूर्व भागातील दुष्काळग्रस्त महिलांनी आज घेराव घातला. कदम यांची गाडी अडवून त्यांना सुमारे अर्धातास घेराव घातला. पाणी आणि चारा द्या अशी घोषणाबाजी करण्यात महिलांनी पतंगरावांना भंडावून सोडले.

 

सांगली शहरातील काँग्रेस कमिटीसमोर अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे पतंगराव कदम यांची काही काळ भंबेरी उडाली. पाणी आणि चारा हा विषय माझ्याकडे नाही तर तो जिल्हापरिषदेकडे येतो असे सांगून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर या महिला जिल्हापरिषदेकडे रवाना झाल्या.

 

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शासने सुद्धा जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. परंतु याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या पतंगराव कदम यांनी तर आज चक्क दुष्काळग्रस्तांना हा विषय माझ्या अख्तारीतला नाही असे सांगून टोलवाटोलवी केली.

 

पिण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लवकर सुटला नाही तर येत्या निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचंही दुष्काळग्रस्तांनी यावेळी जाहीर केले आहे.