खडकवासला विजयात मी ही - मुंडे

मुडें- गडकरी यांच्यात असणारा वाद सर्वश्रुतच आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनचेतना यात्रेच्या निमित्ताने दिसून आला. पुण्यात लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेतच भाजपतील पक्षांतर्गत वाद उघड झाले आहेत. खडकवासला पोटनिवडणुकीत विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातल्या सभेत केला.

Updated: Nov 4, 2011, 11:43 AM IST

झी 24 तास वेब टीम, पुणे

 

मुडें - गडकरी यांच्यात असणारा  वाद सर्वश्रुतच आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनचेतना यात्रेच्या निमित्ताने दिसून आला. पुण्यात लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेतच भाजपतील पक्षांतर्गत वाद उघड झाले आहेत. खडकवासला पोटनिवडणुकीत विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातल्या सभेत केला.

 

आपलाही या विजयात महत्वाचा वाटा असल्याचं त्यांनी सभेत सांगीतलं. मुंडे आणि गडकरी गटातला वाद यामुळं पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. खडकवासला निवडणुकीत मुंडेंनी सुरुवातीला प्रचाराकडे पाठ फिरवली होती, त्यानंतर पुण्याचे भाजप शहराध्यक्ष विकास मठकरी हे व्यासपीठावर असतील, तर प्रचाराच्या व्यासपीठावर येणार नाही, अशी भूमिका मुंडेंनी घेतली होती.

 

पुण्यात गडकरी आणि मुंडे गटातला वाद संपण्याची चिन्हे नाहीत. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या स्वागतावेळीही दोन्ही गटातला वाद उफाळून आला. गडकरी आणि मुंडे गटानं स्वतंत्रपणे अडवाणींच्या यात्रेचं स्वागत केलं. गडकरी गटानं कात्रजमध्ये अडवाणी यांचे स्वागत केलं. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी अडवाणी यांचे स्वागत केले. तर मुंडे गटातर्फे पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी शंकर महाराज मठाजवळ अडवाणींचे स्वागत केले.