www.24taas.com, पुणे
बातमी पुण्याजवळच्या केशवनगरमधल्या अजब कारभाराची... या गावातल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्यानं ग्रामपंचायतींच्या पाच सदस्यांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली. तरी हे पाचही जण निवडणूक लढले आणि जिंकलेसुद्धा... कायद्यांची ऐशीतैशी कशी होते आणि भ्रष्टाचारीच पुन्हा कशी सत्ता गाजवतात, याची ही गोष्ट...
केशवनगर ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली होती. गावातल्या अनधिकृत इमारतींना मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तरीही या सदस्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.
महापालिकेत समाविष्ट करायच्या गावांच्या यादीत या गावाचाही समावेश आहे. त्यामुळे रिअल इस्टेटची गावात चलती आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामं उभी राहिली ती, ग्रामपंचायतीच्या आशीर्वादानंच... त्यांना परवानगी देणाऱ्यांना चाप लागेल, अशी अपेक्षा साफ खोटी ठरली आणि आता याच सदस्यांची चलती सुरू राहणार आहे. हा प्रकार मात्र फक्त केशवनगर पुरताच मर्यादित नाही. तर, महापालिकेलगतच्या सर्वच गावांमध्ये अनधिकृत बांधकामं आणि त्यांना पाठिशी घालणारे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, चुकून कारवाई झालीच तर, त्याचं काय होतं, यासाठी केशवनगरचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.