www.24taas.com, पुणे
पुण्यात अजित पवारांच्या वहिनींनी महार वतनाची जमिन लाटल्याच्या आरोपाला जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळं पुष्टी मिळाली आहे. त्यामुळं अजित पवार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रीहे गावातली जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. महार वतनाच्या जमिनीपैकी काही जमीन अजित पवारांच्या वहिनी शर्मिली पवार यांनी बळकावल्याचा आरोप जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी केला होता.
या आरोपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुष्टी मिळाली आहे. काही जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला होता, त्यात खाडाखोड करून पवार यांनी दुसरा बनावट आदेश तयार केला. हा दुसरा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दफ्तरी नाही. त्यामुळे तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला नाही. अशी माहिती खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.
अजित पवारांनी मात्र कोणी चूक केली असेल तर कारवाई करा असं उत्तर दिलं आहे. आरोप कोण करतोय हे पण तपासून पाहावं, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला आहे. कुटुंबातील व्यक्तीवर आरोप झाल्यानं पोलिसांत जाण्याचे आव्हान अजितदादांनी दिलं आहे. त्यावर आता शेतकरी काय भूमिका घेतात याकडं सगळयांचं लक्ष लागलं आहे.