www.24taas.com, गडचिरोली
गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र सँडल ऑपरेटिंग प्रोसेसचं पालन योग्य पद्धतीनं झाले किंवा नाही हे घटनास्थळी गेल्यानंतरच कळेल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांशी लढण्यासंबंधीच्या कायद्यांबाबत पुनर्विचार होणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्य़क्त केलं. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्यांवर देशपातळीवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या जास्त असल्याचं त्यांनी नमूद केलं. गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सीआरपीएफच्या जवानांची गृहमंत्री आर आर पाटील यांनी नागपुरात जाऊन आज सकाळी भेट घेतली. काल गडचिरोली जिल्ह्यात धानोऱ्याजवळ नक्षवाद्यांनी सीआरपीएफ जवानांची भू सुरूंगाच्या सहाय्यानं गाडी उडवली होती. यात 12 जवान शहीत झाले तर 27 गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.