स्वतःला मृत घोषित करून 'सिडको' भूखंड लाटला

स्वत:ला मृत घोषित करून सिडको अधिकार्‍यांच्या संगनमताने भूखंड हडप केल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन माजी व दोन विद्यमान अधिकार्‍यांसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Jul 19, 2012, 08:18 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

 

स्वत:ला मृत घोषित करून सिडको अधिकार्‍यांच्या संगनमताने भूखंड हडप केल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन माजी व दोन विद्यमान अधिकार्‍यांसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. सिडकोची ५८ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

 
अटक केलेल्या आरोपींमध्ये सिडकोचे वर्ग दोन अधिकारी रमेश लक्ष्मण सोनावणे, दयानंद भास्कर तांडेल, स्वत:ला मृत घोषित केलेले शेतकरी लक्ष्मण तांडेल व त्यांचा मुलगा संजय तांडेल यांचा समावेश आहे. नेरूळ विभागातील करावे गावात राहणार्‍या एका प्रकल्पग्रस्ताने स्वत:ला मृत घोषित करून, स्वत: व मुलांच्या नावावर भूखंड हडप केले असल्याची तक्रार संदीप ठाकूर नावाच्या व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे केली होती. पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईचे पोलीस उपअधीक्षक भरत शेळके यांच्या तपासात हा घोटाळा उघड झाला. आरोपी लक्ष्मण गोविंद तांडेल याने १९८९ मध्ये शासनाने जमीन संपादन केल्यानंतर दिल्या जाणार्‍या अँवॉर्ड कॉपीमध्ये स्वत:चा मृत्यू झाला असल्याचा उल्लेख केला व वारस म्हणून पत्नी, तीन मुले व ३ मुलींचा उल्लेख केला. तत्कालीन मेट्रो सेंटर ३ चे विशेष भूसंपादन अधिकारी अनंत दळवी व भूमी व भूमापन अधिकारी शीला जोशी व सिडकोच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने त्याने हा बदल केला.

 

अॅवॉर्ड कॉपीची प्रत मिळवून त्याची बनावट प्रत तयार केली व त्यावरील मयत असा उल्लेख काढून ती कॉपी सिडकोमध्ये साडेबारा टक्के योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सादर केली. अशाप्रकारे सिडकोकडून २00५ मध्ये नेरूळ सेक्टर ४४ मध्ये २३३.६६ चौ.मी. व सेक्टर ३६ मधील १५0 चौ. मीटरवरील ४0 चौ. मीटर भूखंड २00५ मध्ये त्याने मिळविला आहे. या शेतकर्‍याची पात्रता ४0 चौरस मीटरची असताना त्याने २३३.६६ चौरस मीटर भूखंड मिळविला आहे. त्याची किंमत प्रतिचौरस मीटर २५,२00 रुपये एवढी होती. यात सिडकोची तब्बल ५८ लाख ८८ हजार २३२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.