www.24taas.com, वसई
वसई विरार महापालिकेकडून दोन दिवसांच्या विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चिमाजी आप्पांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातून विसई किल्ला जिंकल्याच्या घटनेला २७४ वर्ष झाल्यानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर विजयोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
चिमाजी अप्पांनी १२ मे १७३९ साली वसई किल्ला जिंकला होता. तब्बल दोन वर्ष लढा देऊन त्यांनी हा किल्ला सर केला होता. त्या निमित्त महापालिकेकडून दोन दिवस विजयोत्सव साजरा केला जातो आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या वसई किल्ल्यावर आजही पोर्तुगिज संस्कृतीच्या खाणाखुणा पहायला मिळतात. विजयोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
त्यात किल्ले बांधण्याच्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच चित्रप्रदर्शन, फोटो शो आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. इतिहासातल्या शौर्याच्या आठवणी जतन करण्यासाठी विजयोत्सव धडाक्यात साजरा केला जातो आहे. त्याला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहून आयोजकांचा उद्देश सफल झाला असंच म्हणावं लागेल.