बेहिशेबी मालमत्ता : तटकरेंविरोधात याचिका

सत्तेचा गैरफायदा घेऊन कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता तटकरेंविरोधात जनहित याचिका दाखल करणयात आली आहे.

Updated: Jun 19, 2012, 10:51 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

सत्तेचा गैरफायदा घेऊन कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता तटकरेंविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

तरकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका करण्यात आली. या याचिकेद्वारे तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडील मालमत्तेच्या स्रोताची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी तसेच तटकरे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

ठाणे येथील धर्मराज्य पक्षाचे महासचिव राजेंद्र फणसे यांनी ही जनहित याचिका केली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी २१ जून रोजी ठेवली आहे.

 

याचिकेत फणसे यांनी दावा केला आहे की, तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या कार्यकाळात रायगड जिल्ह्यात कोटय़वधींची मालमत्ता विकत घेतली आहे. तटकरे यांची स्वत:च्या नावे एकही मालमत्ता नसून त्यांच्या  कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे आहे. तटकरे यांच्या वरदहस्तामुळेच त्यांच्या पदरात या जमीनी पडल्या आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
तसेच तटकरे यांचा मुलगा, मुलगी आणि सून आदींच्या नावे रायगड जिल्ह्यात सुमारे १४०० एकरची जमीन आहे. त्याचप्रमाणे १९३ कंपन्यांमध्ये हे सगळे पदाधिकारी आहेत. या कंपन्या कार्यरत नाहीत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.