www.24taas.com, नवी मुंबई
नववर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला आहे. परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर रिक्षाचालकांनी हा संप मागे घेतलाय.
आनंदाची बाब म्हणजे नवी मुंबईत रिक्षाचे किमान भाडे ११ रुपयेच राहणार आहे. सीनजी रिक्षांसाठी किमान भाडे १५ रुपयांवरुन ११ रुपये केल्याने रिक्षाचालक संतप्त झाले होते, आणि त्यांनी संप पुकारला होता. यामुळं नवी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागत होतं.
मात्र आज परिवहन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, रिक्षाचालकांच्या मागण्यांचा विचार करु, असं लेखी आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर रिक्षाचालकांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र कागदोपत्री ही लढाई अशीच सुरु राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.