सुरेश जैन आज होणार कोर्टात हजर

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या आमदार सुरेश जैन यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची नऊ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

Updated: Mar 19, 2012, 11:27 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या आमदार सुरेश जैन यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची नऊ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

 

 

घरकुल घोटाळ्याप्रकरणी  सुरेश जैन यांना आज जामीन मिळणार की, त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडं लक्ष लागलंय. घरकुल योजनेत २९ कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपखाली जैन याना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

 

 

सुरेशदादा जैन यांना  अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.

 

 

जळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री धरणगाव येथे सापळा रचून जैन यांना अटक केली. सुरेशदादा जैन इंदोरला पळून जाण्याच्या तयारीत होते.  तत्कालिन जळगाव नगरपालिकेत १९९४ पासून या घरकुल घोटाळ्याला सुरुवात झाली. गरीब गरजू झोपडपट्टीवासियांसाठी ११ हजार ४२४ घरांचा हा प्रकल्प होता. या प्रकल्पात जळगावातील ९ ठिकाणी ही घरकुलं बांधण्यात येणार होती. घरकुलांसाठी जे भूखंड निश्चित करण्यात आले होते. ते सर्व भूखंड जळगाव नगरपालिकेच्या मालकीचे नव्हते. शिवाय़ त्या भूखंडावर घराचं बांधकाम करण्याचा बिनशेती परवानाही घेण्य़ात आला नव्हता. शिवाय बांधकामाचा ठेका देण्यात आलेले खानदेश बिल्डरचा पत्ता आणि सुरेश जैन यांचा पत्ता एकच देण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणी ३ फेब्रुवारी २००६मध्ये पहिल्यांदा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर तत्कालिन नगरसेवक पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यासह ९० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातल्या आमदार सुरेश जैन यांच्यासह पाजणांना पोलिसांनी अटक केली होती.