राज ठाकरेंनी घेतले गाव दत्तक

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या 14 गावांतल्या कुपोषणाचं भीषण वास्तव झी 24 तासनं समोर आणलं होतं. आम्ही बातमी दाखवल्यानंतर सुस्त प्रशासनं खडबडून जागं झालंय. पावलं उचलायला सुरूवात केली आहे. तसंच मनसेनही आमची बातमी पाहून 14 गावांपैकी शेंबा हे गाव दत्तक घेतलंय.

Updated: Jun 2, 2012, 10:33 AM IST

www.24taas.com, शेंबा

 

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या 14 गावांतल्या कुपोषणाचं भीषण वास्तव झी 24 तासनं समोर आणलं होतं. आम्ही बातमी दाखवल्यानंतर सुस्त प्रशासनं खडबडून जागं झालंय. पावलं उचलायला सुरूवात केली आहे. तसंच मनसेनही आमची बातमी पाहून 14 गावांपैकी शेंबा हे गाव दत्तक घेतलंय. राज ठाकरेंनी बातमी पाहून हा निर्णय घेतल्याचं मनसेच्या पदाधिका-यांनी सांगितले आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातल्या कुपोषणाचा प्रश्न 'झी 24 तास'ने उपस्थित केल्यानंतर शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतलीय. हा प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसच प्रशासकीय दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

मेळघाट, नंदूरबार किंवा ठाणे या जिल्ह्यातच नव्हे तर आता पश्चिम विदर्भातही कुपोषणाची समस्या तीव्र होत चाललीय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्य़ा 14 गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर झालाय. झी 24 तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

 

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं हे दुर्गम भागातलं शेंबा गाव.. याच गावात आदिवासी उषाबाई तोटा यांचं हे घर.. उषाबाईंच्या पोटी 5 मुली आहेत...त्यातलीच जेमतेम 28 किलो वजन असलेली उषाबाईंची क मुलगी सरजीबाई कुपोषणामुळं मरणासन्न झालीय.. 10-12 दिवसांपूर्वीच सरजीबाईनं मुलीला जन्म दिलाय. पण तिला आपल्या बाळाला एकदाही दूध पाजता आलेलं नाही... उषाबाईंच्या घरची परिस्थिती बिकट आहे.

 

रोजगाराची संधी नाही.. त्यामुळे दररोज घरात चूल पेटेलेच याची शाश्वती नाही.. घरातली 8 ते 10 जणांचा परिवार कसा चालवायाचा हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे.. त्यातच बाळंतपणाला आलेल्या मुलीचं आजारपण आणि कुपोषित बालक यांना अन्न द्यायचं कसं, हा त्यांच्यामोरचा प्रश्न आहे.. सकस अन्न तर सोडाच, पण एकवेळच्या खाण्याचाही मारामार आहे..

 

लोकसंख्या 500च्या घरांत आहे.. गावातल्या ० ते सहा या वयोगटातल्या शंभर मुलांपैकी ५० मुलं कुपोषित आहेत. त्यातली २० पेक्षा जास्त मुलं ही तिस-या श्रेणीत म्हणजे 'डेंजर झोन' मध्ये आहेत. कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसल्यानं अनेकवेळा प्रसुतीदरम्यान मुलं दगावण्याचं प्रमाण मोठं आहे.

 

बुलढाण्यापासून 125 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंबा गावात येण्यासाठी धड रस्ताही नाही. घनदाट जंगलात 10 किलोमीटरचा दगड धोंड्याच्या रस्ता तुडवत या गावात प्रवेश करावा लागतो. अंबा-बरवा अभायरण्यात पुनर्वसनाच्या रगाड्यात हे गाव पुरत फसलंय.. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही आणि शिक्षणचाही पत्ता नाहीये.. दोन हातपंप आहेत, त्यापैकी एक बंद आहे तर दुस-याला फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होतोय.. त्यामुळे गवात हाडांच्या आजाराचं प्रमाणही अधिक आहे.. रस्ताच नसल्याने पावसाळ्यात गाव वाळीत पडतय.. कुपोषणाच्या मुळाशी या सा-या समस्य़ा आहेत.

 

शेंबा गावाचीच नव्हे तर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अशा 14 गावांमध्ये हीच रड प्रत्येक गावात आहे. त्यात शेंबा, गुमठी, चुनखडी आणि अंबाबरवा या गावात कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलाय.. सरकारदरबारी आकडेवारीत आणि पैसे खाण्यात मग्न असलेल्या नोकरशहांना या गावांची आठवण येणार का, आणि त्यांचे प्रश्न कधी सुटणार, हा आर्त सवाल हे ग्रामस्थ विचारतायेत..