www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादच्या हसरूल जेलमधील पॅरोल रजेवर गेलेले २३६ कैदी फरार झाले आहेत. या कैंद्यांना शोधण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू आहे. या कैंद्यांच्या जामीनदारांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचं कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
जन्मठेपेची शिक्षा असलेल्या कैद्यांना कुटूंबाबरोवर राहण्यासाठी अशा पॅरोलवर जाण्याची तरतूद केली जात असते. मात्र आत्तापर्यंत पॅरोलवर गेलेले २३६ कैदी पुन्हा परतलेलेच नाहीत. कारागृहाच्या औरंगाबाद विभागात 10 जिल्हा कार्यालये तसंच नाशिक आणि हर्सुल येथील मध्यवर्ती कार्यालय अशा 12 कारागृहांचा समावेश आहे. या कारागृहांत जन्मठेप झालेले अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहात राहत असल्याने कैद्यांची मानसिकता बदलते, ब-याच वेळा त्यांच्यात नैराश्य येते,या परिस्थितीत कैद्यांचे कुटुंबियांशी असणारे संबंध दुरावणार नाहीत यासाठी या कैद्यांना विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पँरोलवर सोडले जाते. पँरोलवर सुटताना कैदी गुन्हेगारी स्वरुपाची कृती करणार नाही याची हमी जामिनदाराकडून घेतली जाते. पोलिसांकडून अहवाल मागवला जातो आणि त्यानंतरच रजा मंजूर केली जाते.
मात्र आता कारागृहात न परतलेल्या कैद्यांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गायब झालेल्या या कैद्यांमद्ये प्रामुख्याने जन्मठेप भोगणारे कैदी आणि 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले कैदी आहेत..