www.24taas.com, औरंगाबाद
औंरगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका घराचं छत कोसळल्यानं दोघा मुलांचा मृत्यू झालाय. या कारवाईदरम्यान छत कोसळल्यानं तीन मुलं अडकून राहिली होती. त्यांच्यापैकी एकालाच वाचवण्यात यश आलंय, आणि दोघांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळं संतप्त जमावानं अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केलीय. यात काही जण जखमी झाले आहेत. औरंगाबादेतल्या शहागंज भागात ही कारवाई सुरू आहे.
आज शहागंज भागात रस्त्याच्या आड येणारी दुकानं आणि घरं पाडणं चालू होतं. यावेळी जीसीबीच्या सहाय्याने दुकानं पाडत असताना एका घराचं छत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही मुलं घरातील सामान, भंगार काढण्यासाठी आत गेली होती. मात्र, त्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. जीसीबीने हटवताना छत अचानक कोसळलं आणि तीनपैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या मुलास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली होती. नागरिकांना यासंदर्भात ६ ते ७ दिवसांपूर्वीच तशी नोटीस देण्यात आली होती. त्याप्रमाणे नागरिकांनी आपली घरं आणि दुकानं रिकामीही केली होती. पण, गरीब घरातील ३ मुलं सामान भंगारात विकता यावं, यासाठी घरात गेली होती. आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
मात्र, या प्रकारामुळे शहागंज भागात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेमुळं संतप्त जमावानं अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केलीय. यामध्ये पोलिसांच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे, तसंच काही पत्रकारही यामध्ये जखमी झाले आहेत. महापौर, पोलीस आयुक्त, डीसीपी सर्वांनी या स्थळी येऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.