झी २४ तास वेब टीम, बीड
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीनामे दिलेत. त्यामुळे अजित दादांनी मुंडे यांना त्यांच्याच जिल्ह्यात आणखी एक धक्का दिल्याचं बोललं जातंय. बँकेवर प्रशासक नियुक्त करावा अन्यथा बँक बरखास्त करावी अशी मागणीही करण्यात आलीये.
मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महायुती होती. मागील 2 ते 3 वर्षांपासून या बँकेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले यात 7 संचालकांवर गुन्हे दाखल झाले होते मात्र ते अजूनही फरार आहेत. आज या बँकेच्या 74 शाखा पैशांआभावी बंद आहेत. 23 संचालकांच्या या बँकेतील 7 संचालक फरार आहेत. त्यातच एकदम 10 संचालकांनी राजीनामे दिल्याने बँक बरखास्त होणार अथवा प्रशासक नेमण्यात येणार हे निश्चीत आहे. या माध्यमातून अजित दादांनी मुंडे यांना 'होम पीच'वर चांगलेच अडचणीत आणले आहे.