यूपीएच्या डिनरला ममता बॅनर्जींची दांडी

एकीकडे युपीए टू सरकार तिसरी वर्षपूर्ती करत असताना घटक पक्षांमधली धुसफूसही चालूच असल्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

Updated: May 22, 2012, 02:19 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

एकीकडे युपीए टू सरकार तिसरी वर्षपूर्ती करत असताना घटक पक्षांमधली धुसफूसही चालूच असल्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

डिनरला न जाण्याचं कारण बॅनर्जींनी दिलेलं नसलं तरी पश्चिम बंगालला पॅकेज देण्यावरून काँग्रेस आणि तृणमूलमध्ये मतभेद आहेत, त्यातूनच पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला जाण्याचं ममता टाळत असाव्यात अशी शक्यता आहे. तसं करून काँग्रेसला इशारा देण्याचा त्यांना प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जींना पाठिंबा देणार नसल्याचे संकेतही ममतांनी दिले आहेत. मुखर्जींऐवजी मीरा कुमार यांचं नाव पुढे करून त्यांनी काँग्रेसला आणखी पेचात टाकलंय.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या प्रीतीभोजनाला न जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी काँग्रेसला आणखी एक इशारा दिल्याचं मानलं जातंय. एकूणच तिसऱ्या वर्षपूर्तीलाही ममतांच्या नाराजीची किनार पुन्हा अधोरेखित झालीय.