मुकेश अंबानी खाऊ गल्लीत भेटीला येणार

देशातील खाजगी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या वर्षी फास्ट फूड व्यवसायात प्रवेश करणार आहे. रिलायन्स या क्षेत्रात स्वताचा ब्रँड लँच करणार आहे. रिलायन्स याआधीच देशातील वेगाने वाढत्या युवा लोकसंख्येशी रिटेल आणि 4G वायरलेस सेवांच्या माध्यमातून नातं जोडलं आहे.

Updated: Dec 12, 2011, 06:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

देशातील खाजगी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या वर्षी फास्ट फूड व्यवसायात प्रवेश करणार आहे. रिलायन्स या क्षेत्रात स्वताचा ब्रँड लँच करणार आहे. रिलायन्स याआधीच देशातील वेगाने वाढत्या युवा लोकसंख्येशी रिटेल आणि 4G वायरलेस सेवांच्या माध्यमातून नातं जोडलं आहे.मुकेश अंबांनी फास्ट फूड व्यवसायाची धूरा रिषी नेगी यांच्यावर सोपवली आहे. फेम इंडिया या मल्टीप्लेक्स कंपनीचे सीओओ असलेले नेगींना प्रदीर्घ अनुभवाचे पाठबळ आहे. रिलायन्सने येत्या दोन ते तीन महिन्यात क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटची संकल्पना विकसीत करण्याचं ठरवलं आहे. रिलायन्सला आव्हान असेल ते मॅकडोनाल्डस आणि डॉमिनोज तसंच जंबो किंग आणि श्रावणा भवन या फास्ट फूड चेन्सचं.

 

रिलायन्सला मॅकडोनाल्ड्स आणि डॉमिनोजच्या धर्तीवर मॉडेल विकसीत करायचं आहे. देशात फास्ट फूड व्यवसाय दरवर्षी २५ टक्के वेगाने वाढतोय. सध्या फास्ट फूड व्यवसायाची वार्षिक उलाढाल ७००० ते ८५०० कोटी रुपयां दरम्यान आहे ती २०१५ साली २८,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रिलायन्स रिटेल देशभरात रिलायन्स फ्रेश, रिलायन्स सुपर आणि रिलायन्स मार्ट या सारखे ११४६ मल्टी ब्रँड आउटलेटस चालवतं. रिलायन्स 4G चे पॅन इंडिया लायन्स देण्यात आलं असून १०० एमबीपीएस वेगाने ते इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करुन देऊ शकते. रिलायन्स येत्या काही महिन्यात दहा रुपये प्रति जीबी इतक्या स्वस्तात इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणार आहे. रिलायन्सने आजवर अनेक क्षेत्रात मारलेली मुसंडीची पुनरावृत्ती फास्ट फूड क्षेत्रात करुन दाखवेल का ? हे लवकरच कळेल.