भंवरीदेवी हत्याकांड : दुसरे आरोपपत्र दाखल

भंवरीदेवी हत्याकांडासंबंधात केंद्रीय गुप्तचर विभागाने बुधवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अपहरण आणि हत्येतील मुख्य आरोपी म्हणून राजस्थानचे बडतर्फ मंत्री महिपाल मदेरना आणि काँग्रेस आमदार मलखान सिंग यांची नावे आहेत.

Updated: Mar 1, 2012, 11:41 AM IST

www.24taas.com,  जोधपूर

 

 

राज्यस्थानमधील भंवरीदेवी हत्याकांडासंबंधात केंद्रीय गुप्तचर विभागाने बुधवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अपहरण आणि हत्येतील मुख्य आरोपी म्हणून राजस्थानचे बडतर्फ मंत्री महिपाल मदेरना आणि काँग्रेस आमदार मलखान सिंग यांची नावे आहेत. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

 

 

केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआयने) दाखल केलेल्या या ९७ पानी आरोपपत्रात खून, फौजदारी कट, अपहरण आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; असे आरोप ठेवण्यात आले आहेत. सीबीआयने गेल्या डिसेंबरमध्ये या हत्याकांडाबाबत पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात सोहन, शहाबुद्दिन आणि बलिया हे आरोपी आहेत. पुखराज, दिनेश, रेशमरम आणि मलखान सिंगची बहिण इंदिरा बिष्णोई यांच्याविरोधातील तपास अद्याप सुरू आहे.

 

 

सीबीआयने ३०० साक्षीदारांच्या जबान्या नोंदविल्या आहेत. भंवरीदेवी गेल्या वर्षी १ सप्टेंबरला जोधपूरमधील बिलारा भागातील तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पतीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात मदेरना यांचाच हात असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांची राजस्थान मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली गेली.

 

 

काय करायची भवरी..

भंवरीदेवी हिची अपहरणानंतर हत्या झाली होती. तिचा मृतदेह जलोदा येथे जाळला होता. त्यानंतर काही  वस्तू राजीव गांधी कालव्यात बुडवल्याचे तपासात उघड झाले होते.

 

भंवरीदेवी हिचे मदेरना आणि मलखान सिंग यांच्याशी अनैतिक संबंध होते आणि ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली होती. मदेरना यांच्याकडे तिने ५० लाख रुपयांची मागणी केली होती तर मलखान हाच आपल्या मुलीचा बाप आहे, असे आपण बिष्णोई समाजाच्या ७ सप्टेंबरला होणाऱ्या मेळाव्यात जाहीर करू, अशा धमक्याही ती देत होती, असे तपास अहवालात म्हटले आहे.