www.24taas.com, नवी दिल्ली
बाबरी मशिदीचं भूत पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मानगुटीवर बसलं आहे. बाबरी मशिद उध्वस्त केल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी अडवाणींवर विरोधात असलेले आरोप मागे घेण्यास सीबीआयनं विरोध दर्शवला आहे. बाबरीप्रकरणी अडवाणींसह गुन्हा दाखल करण्यात आलेल्य़ा भाजपच्या सात नेत्यांविरोधातही खटला चालवण्यात यावा अशी मागणी सीबीआयनं सुप्रीम कोर्टात केली आहे.
६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशिद उध्वस्त केल्यानंतर काही कार सेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मशिद उध्वस्त करण्याचा कट केल्याप्रकरणी अडवाणींसह मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयार, अशोक सिंघल, गिरीराज किशोर, विष्णू हरी दालमिया आणि साध्वी रितंभरा या आठ जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशीची सूत्रं सीबीआयनं आपल्या हाती घेतली आणि अडवाणींसह ४० जणांविरोधात लखनऊ कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
अडवाणींचा जरी बाबरी मशिद उध्वस्त करण्यात प्रत्यक्ष हात नसला तरी त्यांच्याविरोधात कट केल्याचा आरोप आहे. त्यामुळं या गुन्ह्यांबाबतचे खटले एकत्रच चालवण्यात यावेत अशी मागणी आता सीबीआयनं केली आहे. त्यामुळं अडवाणी आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.