www.24taas.com, गुवाहाटी
असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यासह पूरग्रस्त स्थितीची हवाई पाहणी केली. त्यात माजुली द्वीप, जोरहाट, शिवसागर, लखिमपूर आणि धेमाजी जिल्ह्यासह काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याचा समावेश आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील नागरिक अनेक संकटांशी सामना करत असून, त्यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत देण्यात येईल, असे पंतप्रधानांनी लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान आसाममधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक येथे दाखल झाले आहे. पाहणीनंतर ते त्वरित आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे, असेही सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, की हे केंद्रीय पथक राज्यातील पीक, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीचा आढावा घेणार असून, सार्वजनिक क्षेत्रातील शाळा, पाणी पुरवठा यंत्रणा आणि रुग्णालयांच्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दृष्टीने अहवाल तयार करणार आहेत.