www.24taas.com, नवी दिल्ली
आपल्या वक्तव्यांवर घुमजाव करणं ही जणू काही आता काँग्रेसची ओळखच बनत चाललीय. आता ‘१ किलो तांदुळावर १ रुपया जास्त खर्च करणं मध्यमवर्गीयांना का सहन होत नाही? आईस्क्रीम खाताना ते १५ रुपये सहज खर्च करतात’ असं म्हणणाऱ्या पी. चिदंबरम यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलंय. 'मी मध्यमवर्गीयांची थट्टा केली नाही. मध्यमवर्गीय असाही उल्लेख केला नाही. मी 'आम्ही' असा उल्लेख केला होता', असं स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिलंय.
'काही लोक पाण्याच्या बाटल्यांवर १५ रुपये खर्च करतात. आईस्क्रीमवर उधळपट्टी करतात.पण गहू १ रुपयाने जरी महागला, तरी त्यांना सहन होत नाही, असं चिदंबरम यांनी काल म्हटलं होतं. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. 'मी कुणाचीही चेष्टा केली नाही. मीडियानंच माझ्या वाक्यांना तोडून-मोडून त्यातून वेगवेगळे अर्थ काढले,' असं स्पष्टीकरण पी. चिदंबरम यांनी दिलंय.
यापूर्वी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनीही काँग्रेसला नव्या विचारधारेची गरज असल्याचं वक्तव्य करून नंतर घुमजाव केलं होतं.