www.24taas.com, नवी दिल्ली
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने भारतातील तेल कंपन्या पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचारात आहेत.महागाईच्या आगीत होरपळणार्या जनतेला ही खुशखबर आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर तब्बल साडेसात रुपयांनी वाढवून जनतेला जोरदार दणका दिला होता. त्यावर संतप्त जनतेत उद्रेक झाल्याने वाढलेला दर कमी केला. पेट्रोल दरवाढीविरोधात एनडीएने बंदही पुकारला होता. त्यानंतर सरकारने दोन रूपयांनी पेट्रोलची किंमत कमी केली.
आता मात्र जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर बॅरलमागे ९१ डॉलर इतका कमी झाला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर कमी करणे तेल कंपन्यांना भाग पडणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस तेल कंपन्या पेट्रोलचे दर ५ रुपयांनी उतरवण्याची घोषणा करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे वाहन चालकांना थोडासा दिसाला मिळेल.