उदार राष्ट्रपती... मृत व्यक्तीलाही दिलं 'जीवदान'

राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... आता आणखी एक इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदवलाय. फाशिची शिक्षा सुनावलेल्या ३५ कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलणाऱ्या त्या भारताच्या गेल्या तीन दशकांतील पहिला राष्ट्रपती ठरल्यात.

Updated: Jun 23, 2012, 03:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली  

 

राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... आता आणखी एक इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदवलाय. फाशिची शिक्षा सुनावलेल्या ३५ कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलणाऱ्या त्या भारताच्या गेल्या तीन दशकांतील पहिला राष्ट्रपती ठरल्यात. एवढंच नाही तर राष्ट्रपतींनी चक्क एका मृत व्यक्तीलाही ‘जीवदान’ दिलंय.

 

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अक्षम्य अपराध करणाऱ्या ५ व्यक्तिंची द्या याचिका मात्र फेटाळून लावलीय. याचिका फेटाळल्या गेलेल्यांमध्ये राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचाही समावेश आहे.  परंतू वेगवेगळ्या १९ खटल्यांमधल्या ३५ दोषींच्या द्या याचिकेवर मात्र प्रतिभाताईंनी ‘द्या’ दाखवली आहे. यामध्ये सामूहिक हत्या, अपहरण, बलात्कार आणि बालहत्यासारखे अपराध करणाऱ्या गुन्हेगारांचा समावेश आहे. मागच्या तीन दशकांमध्ये भारतातल्या कोणत्याही राष्ट्रपतींनी एवढ्या मोठ्या संख्येत गुन्हेगारांवर ‘द्या’ दाखविली नव्हती.

 

प्रतिभाताईंनी २ जून रोजी कर्नाटकच्या बंदू बाबूराव तिडके, उत्तरप्रदेशच्या बंटू तसंच राजस्थानच्या लालचंद उर्फ ललिया धूम आणि शिवलाल या चार जणांची शिक्षा कमी केली आहे. उत्तरप्रदेशातली बंटूला एका ९ वर्षीय मुलीचा बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली जुलै २००८ रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. तर  ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींनी सुशील मुरमू याच्या द्या याचिकेला मंजुरी दिली होती. २००४ पासून ही दया याचिका निर्णयाच्या प्रतिक्षेत होती. सुशील मुरमू याला, आपली भरभराट व्हावी यासाठी एका ९ वर्षांच्या मुलीचा बळी देण्याच्या गुन्ह्यामुळे फाशीची शिक्षा सुनावली गेली होती.

 

मृत व्यक्तीला दिलं जीवदान

यातली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बंदू तिडके या ५ वर्षांपूर्वीच निधन झालेल्या व्यक्तीचीही द्यावान राष्ट्रपतींनी फाशीची शिक्षा रद्द केलीय. बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगार म्हणून काम करणारा तिडके २००२ साली कर्नाटकात स्थलांतरीत झाला होता. कर्नाटकातल्या सदाशिव अप्पना मठाच्या स्वामीच्या रुपात एका १६ वर्षांच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि हत्येचा आरोप या बंदू तिडकेवर होता. मुलीचा खून केल्यानंतर तिच्या मृत शरिराला तिडकेनं शिर्डीला आणून टाकली आणि इथंच त्याला अटक झाली होती. याच गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. पण ३१ वर्षांच्या तिडकेची १८ ऑक्टोबर २००७ रोजी बेळगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी २ जून रोजी तिडके याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

 

.

 

.