www.24taas.com, नवी दिल्ली
वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांना आयकर रिटर्न्स भरण्याची आवश्यकता नसल्याचं अर्थ मंत्रालयाच्या एक निर्देशात म्हटलं आहे. देशभरात जवळपास ८५ लाख पगारदार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न सर्व स्त्रोतातून पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, तसंच बचत खात्यात व्याजापोटी वर्षाला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न नाही, अशांना २०१२-१३ साली रिटर्न्स भरण्याची आवश्यकता नसल्याचं अर्थ मंत्रालयाने निर्देशात स्पष्ट केलं आहे.
पण ही सूट ज्यांना मालकांकडून कर कपातीचे प्रमाणपत्र फॉर्म १६ त्यांनाच लागू असल्याचंही नमुद करण्यात आलं आहे. पण आयकर रिफंड मिळण्यासाठी मात्र रिटर्न्स भरावे लागतील. या निर्देशाच्या अगोदर सर्व पगारदार व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं आवश्यक होतं.
सध्या १.८० ते ५ लाख रुपयांपर्यंत १० टक्के, ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर २० टक्के आणि आठ लाख रुपयांवर उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के आयकर भरावा लागतो. सध्या संसदेच्या पॅनेल समोर डायरेक्ट टॅक्स कोड बिलाने आयकर सूट मिळण्याची मर्यादा १ लाख ८० हजार रुपयांवरुन दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
पुरुषांसाठी...
१.८० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
याआधी ही मर्यादा १.६० लाख होती
महिलांसाठी ...
महिलांसाठी मागील १.९० लाखांची मर्यादा कायम
ज्येष्ठ नागरिकांसाठी...
ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्ष
यातही दोन ६० ते ७९ आणि ८० ते पुढे असे दोन भाग पाडण्यात आले आहेत.
६० ते ८० वर्ष वयोमर्यादेतील ज्येष्ठांना २.५० पर्यंतचे उत्पन्न करमुक्त
८० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी विशेष करसवलत
८० वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त