ठाणे झेडपीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता उलथवण्यासाठी युती सरसावली आहे.

Updated: Jan 17, 2012, 11:01 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता उलथवण्यासाठी युती सरसावली आहे. राज्यमंत्री गावितांनीही काँग्रेसकडून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना ग्रामीण भागात झेडपी निवडणुकीची लगबग सुरू आहे.

 

राष्ट्रवादीनं पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडं, काँग्रेसनं राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याकडं तर शिवसेनेची जबाबदारी एकनाथ शिंदे, गोपाळ लांडगे यांच्याकडं आहे. २००७ च्या निवडणुकीत ६८ जागा असलेल्या झेडपीत राष्ट्रवादीला २३, काँग्रेसला ४, शिवसेनेला १६, भाजपला ४ माकपला ८ तर अपक्ष आणि इतर आघाड्यांना १३ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकाऱ्यांच्या मदतीनं झेडपीवर गाजवली. गेल्या पाच वर्षातल्या कामाच्या जोरावर पुन्हा राष्ठ्रवादीच सत्तेत येईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

तर गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी काहीच कामं केली नाहीत. ग्रामीण भागाची प्रगती झाली नाही. त्यामुळं यावेळी मतदार युतीच्या ताब्यात झेडपीची सत्ता देतील असा विश्वास शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भाजप शिवसेना युती करुनच झेडपीची निवडणुक लढवणार आहेत. त्यांच्या मदतीला आगरी सेनाही असण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची कुणबी सेनेबरोबर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे राज्यमंत्री गावित यांच्याशी मतभेद आहेत. त्यामुळं झेडपीत काही ठिकाणीच दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या मतभेदाचा फायदा घेण्यात युती कितपत यशस्वी होते त्यावरच सत्तेची समीकरणं अवलंबून आहेत.