www.24taas.com, अहमदनगर
आहमदनगर जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १५० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आज सकाळी आपल्या लोणी या गावी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जोर्वे या गावी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनीही आपल्या कष्टी या गावी मतदान केलं. निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी परस्परांच्या विरोधात उभी असल्यानं दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दुसरीकडं सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६७ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी मतदान होत आहे.
सध्या जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून बहुतांशी पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे. मुख्यमंत्रीपद सातारा जिल्ह्याला मिळाल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात घेण्याचा चंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांधला आहे.