बॉलिवूडमध्ये सुनील शेट्टीची ओळख ऍक्शन हिरो म्हणून आहे. सुनील शेट्टीने सुरवातीच्या काळात आपल्या बलदंड शरीरयष्टीच्या भांडवलावर सिनेमे मिळवले. बलवान, मोहरा, सुरक्षा, शस्त्र, रक्षक, कृष्णा, आक्रोश आणि दस ही सुनील शेट्टीच्या देमार सिनेमाची वानगी दाखल काही नावं. आता या सिनेमांमध्ये त्याने फारसा अभिनय केला नव्हता हे परत सांगणे न लगे. पण जबरदस्त शारिरीक ताकदीच्या सुनील शेट्टीलासुध्दा सिने निर्मिती करणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं काम आहे हे कबूल करण्याची पाळी ओढावली आहे. सिने निर्मितीचा ताण आणि कटकटींमुळे हे आपलं काम नव्हे याची त्याला जाणीव झाली आहे.
सुनील शेट्टीने आठ वर्षापूर्वी पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स लि ही कंपनी सुरु केली होती. पॉपकॉर्नने खेल, रक्त, भागमभाग आणि लूट या सिनेमांची निर्मिती केली. बहुधा सुनीलला पहिल्या वेळेस सिनेनिर्मिती करणं हा खेळ वाटला असावा पण नंतर यात आर्थिक रक्तस्त्राव होतो याचा त्याला साक्षात्कार झाला असावा आणि नंतर ओघाने भागमभाग झाली असावी. लूट हे त्याच्या लेटेस्ट सिनेमाचे नावही समर्पक असावं आपण लुटले गेलो आहोत हे त्याला कळलं असावं. सुमार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वीस वर्षे काढणं हे सुध्दा एकप्रकारे यशोशिखर गाठण्यासारखंच आहे.