www.24taas.com, कोल्हापूर
मराठी चित्रपटसृष्टीत एकेकाळी फाईटमास्टर म्हणून प्रसिद्धी मिळवलेले कोल्हापुरचे अशोक पैलवान सध्या अंथरुणाशी खिळून आहेत. चित्रपटात काम मिळत नाही, म्हणून प्रसंगी रिक्षाव्यवसायही केला. मात्र, अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे त्यांच्यावर गंभीर संकट ओढवलं आहे. अशावेळी रोजच्या रहाटगाड्याबरोबरच औषधोपचारांचा खर्च करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
अशोक पैलवान. यांनी अनेक मराठी सिनेमांमधून खलनायकी भूमिका रंगवणारा अस्सल कोल्हापुरी मातीतला कलाकार. अनेक कलाकारांना चित्रपटांमध्ये फाईटिंगच्या टिप्स देणारा कलाकार सध्या मात्र जीवनाशी संघर्ष करतो आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाल्यानं त्यांच्या पायाला गॅंगरिंन झालं आणि तेव्हापासूनच हा उत्साही कलाकार अंथरुणाला खिळला. गँगरिनमुळे त्यांच्या पायाची चार बोटे कापावी लागली. चित्रपटात काम मिळेना, म्हणून त्यांनी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय स्विकारला, मात्र अशा अवस्थेत रिक्षा चालवणंही कठीण होऊन बसलं.
अशावेळी औषधोपचारांचा खर्च भागवायचा तरी कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या मनस्वी कलाकाराची अवस्था पाहून काहीजणांनी मदतीचा हात पुढे केला आहे. रिक्षा चालविणारे त्यांचे सोबतीही हळहळ व्यक्त करत आहेत. सरकारसह सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना ठोस काहीतरी मदत करावी, अशी मागणी हे सहकारी करत आहेत.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, शिवाजी साटम, डॅनी डेन्जोपा अशा अनेक कलाकारांबरोबर अशोक पैलवान यांनी काम केलं आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ते कलाकारांसाठी मिळणाऱ्या मानधनासाठी झगडत आहेत. मात्र अजूनही सरकार दरबारी त्यांचा आवाज पोचलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. या मराठमोळ्या कलाकाराला आर्थिक मदतीचा हात मिळाला, तर तो नक्कीच एक मोठा दिलासा ठरेल....