www.24taas.com, पुणे
बॉलिवूडमधील अभिनेत्री अचला सचदेव (९१) यांचे दीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांच्यावर आज मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अचला सचदेव यांचा १९२० मध्ये पेशावर येथे जन्म झाला होता. ‘फॅशनेबल वाइफ’ या चित्रपटाद्वारे १९३८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. साधारण १३० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या असून त्यांनी साकारलेल्या आई किंवा आजीच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. हकिकत, वक्त, ज्यूली, मेरा नाम जोकर, कोरा कागज, अपना बनाके देखो, हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटांबरोबरच अलिकडच्या काळातील कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, ना तुम जानो ना हम या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
गेल्या चार दशकांपासून त्या पुण्यात राहत होत्या. सप्टेंबर महिन्यापासून सचदेव आजारी होत्या. घरात पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना अर्धागवायूचा झटका आल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच क्षीण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत होत्या. आपल्या संपत्तीमधील काही हिस्सा त्यांनी जनसेवा फाउंडेशनला दान केला होता. त्यामधून फाउंडेशनने ‘अचला इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’ ची स्थापना केली असून त्याद्वारे महिलांसाठी नर्सिग स्कूल चालवले जाते.