महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षा कधी होणार?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

Updated: Apr 13, 2020, 08:05 PM IST
महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षा कधी होणार?  title=

प्रतिनिधी, मुंबई :  दहावीचा भूगोल विषयाचा पेपर तसेच नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असला तरी महाविद्यालये आणि विद्यापीठ परीक्षांचे काय होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज याबाबत खुलासा केला.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा रद्द झाल्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागानं घेतलेला नाही, असा खुलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

परीक्षा कधी होणार?

महाविद्यालय, तसेच विद्यापीठांच्या परीक्षा कधी होणार याबाबत सरकार नेमका काय विचार करत आहे याची माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

परीक्षा कधी, कशा आणि कोणत्या कालावधी मध्ये घ्यायच्या याबाबत कुलगुरुंची समिती गठित करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिली. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिली.

सरकारने नेमलेल्या कुलगुरुंची समिती शिफारशी करेल आणि त्या राज्यपालांकडे पाठवून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

 

कोरोनाच्या संकटामुळे भविष्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर परीक्षांबाबत जो निर्णय घेतला जाईल ते वेळोवेळी अधिकृतरित्या कळविण्यात येईल, असंही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.