मुलुंड स्थानकावर महिलेचा गोंडस बाळाला जन्म

लोकलमधून एकही महिला सहप्रवासी मदतीसाठी पुढे सरसावले नाही. 

Updated: Jun 24, 2019, 09:10 PM IST
मुलुंड स्थानकावर महिलेचा गोंडस बाळाला जन्म title=

मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर आज एका महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हबीब निसा रहीस मन्सूरी ही गर्भवती महिला टिटवाळा येथून सायनकडे जाण्यासाठी सकाळी साडे आठच्या दरम्यान टिटवाळा लोकलने प्रवास करत होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर या महिलेला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. या वेदना असाह्य झाल्यामुळे अखेर मुलुंड रेल्वे स्थानकावर ही लोकल येताच सहप्रवाशांनी आपात्कालीन साखळी खेचून लोकल फलाटावर थांबविली. त्यावेळी फलाट क्रमांक दोनवर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शितल सानप या आणि काही महिला सफाई कर्मचारी महिला डब्याजवळ पोहोचल्या आणि त्यांनी लोकलमधून या महिलेला फलाटावर आणले.

महिलेला इस्पितळात दाखल करण्यापूर्वी प्रसंगावधान राखत या महिलांनी निसाची फलाटावरच प्रसूती केली. निसाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या घटनेत महिला सहप्रवाशांची असंवेदनशीलता दिसून आली. 

या महिलेला लोकलमधून बाहेर काढण्यासाठी एकही महिला सहप्रवासी मदतीसाठी पुढे सरसावले नाही. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना या गर्भवती महिलेला लोकलमधून बाहेर काढण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागलं.