Why I Killed Gandhi : खासदार अमोल कोल्हे दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत

३० जानेवारीला प्रदर्शित होतोय चित्रपट

Updated: Jan 20, 2022, 07:48 PM IST
Why I Killed Gandhi : खासदार अमोल कोल्हे दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत title=

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. 30 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'Why I Killed Gandhi' या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात खासदार कोल्हे यांनी नथुराम गोडसेचे भूमिका साकारली आहे. मात्र, या प्रोमोमुळे अमोल कोल्हे यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

अमोल कोल्हे यांनी हा चित्रपट करण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे या प्रोमोत?
'नव्याने बनलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती नामशेष करण्यासाठी जे हिंदूवर अत्याचार केले जात आहेत त्याचं मूळ कारण महात्मा गांधी हे आहेत.' मी महात्मा गांधींची हत्या केली. त्या कार्यक्रमाची स्वातंत्र्यवीर सावरकरांना जराशीही कल्पना नव्हती. अमानुषपणे झालेल्या भारत विभाजनामध्ये दीड कोटीपेक्षा अधिक लोक बेघर झाले आणि लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला,'' असं वाक्य खासदार कोल्हे बोलताना दिसत आहेत.

उदात्तीकरणासाठी कधीच हातभार लावलेला नाही : खा. कोल्हे 
ज्यावेळी एक कलाकार म्हणून एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेशी कळत न कळत सहमत असतो. चित्रपटातील काही घटनांशी शंभर टक्के वैचारीक सहमती असते तर अनेकदा आपण साकारणाऱ्या भूमिकेशी सहमती नसते. तरीही त्या त्या चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार आव्हानात्मक भूमिका साकारतो. 2017 मध्ये अशा चित्रपटामध्ये काम केलं होतं. आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मधल्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणासाठी मी कधीच हातभार लावलेला नाही.
आपल्या देशात लोकशाही असून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये भूमिका नाकारण्याचं आणि लपविण्याचं कारण नाही. देशाचा सजग नागरिक म्हणून विचार माडंण्याचं आणि व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.