मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) देश सोडून परदेशात गेले आहेत? हा प्रश्न सध्या एनआयए (NIA), मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) पडला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांना डिलिव्हर झालेलं नाही. कारण ज्या पत्त्यावर समन्स पाठवण्यात आलेलं आहे, त्या पत्त्यावर परमबीर सिंह नाहीएत, एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.
सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंह एकदा एनआयए ऑफिसला आले होते, आणि दोन तास थांबले होते. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने मुंबई आणि चंदीगड इथल्या परमबीर सिंग यांच्या पत्त्यावरही अनेक वेळा समन्स पाठवले आहेत, परंतु ते समन्सही परमबीर सिंग मिळालेले नाहीत.
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांच्यावर कोणताही आरोप करण्यात आलेला नसला, तरी अनेक ठिकाणी परमबीर सिंग यांचा उल्लेख आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरु केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीजे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं, पण त्यांनीच काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंह यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.