मुख्य सचिवांचं काय होणार? सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची मुदत येत्या 30 जून रोजी संपत आहे.   

Updated: Jun 24, 2020, 01:59 PM IST
मुख्य सचिवांचं काय होणार? सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची मुदत येत्या ३० जून रोजी संपत असून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मेहता यांना यापूर्वी दोनदा मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली आहे. त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांचा विरोध आहे. तर मेहतांना मुदतवाढ दिली तर प्रशासनातील इतर अधिकार्‍यांची मुख्य सचिव बनण्याची संधी हुकणार आहे़, तर अनेक सनदी अधिकार्‍यांच्या बढतीची संधी हुकणार आहे. 

त्यामुळे मेहतांना मुदतवाढ दिल्यास प्रशासनात नाराजीचा सूर उमटण्याची चिन्हं आहेत. मेहतांना मुदतवाढ मिळाली नाही तर उद्धव ठाकरे त्यांना आपले मुख्य सल्लागार नियुक्त करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र यालाही मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांचा विरोध आहे. मेहता यांना मुदतवाढ मिळाली नाही तर तीन अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार स्पर्धेत आहेत. 

यात गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार असून ते फेब्रुवारी २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत. त्याचबरोबर सध्या सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असलेले १९८५ च्या बॅचचे सीताराम कुंटे हेही स्पर्धेत आहेत. 

कुंटे नोव्हेंबर २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशीही १९८५ च्या बॅचचे असून तेही नोव्हेंबर २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत. मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आहेत, तसंच शरद पवार यांच्याबरोबरही मेहतांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळेच मेहतांना मुदतवाढ मिळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.