Weather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान

IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

सुरभि जगदीश | Updated: Dec 15, 2023, 07:23 AM IST
Weather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान title=

IMD Weather News: मुंबईत म्हणावी तशी थंडी अजून पडलेली नाही. सध्या डोंगराळ भागात थंडीची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होताना दिसतोय. उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

गुरुवारी रात्री मुंबईच्या सांताक्रूझ हवामान केंद्रात नोंदलेला पारा 19.4 अंश सेल्सिअस इतका होता. दरम्यान, कमाल तापमान 32.8 अंश होतं, जे सामान्यपेक्षा कमी आहे. त्यामुळे सध्याच्या हवामानानुसार, नागरिकांना सकाळी कडाक्याची थंडी आणि दुपारी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

20 अंशांच्या खाली तापमानाची नोंद होण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे. पुढच्या आठवड्यात तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या  अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या स्वच्छ दिवस आणि निर्मळ रात्र आहेत. त्यामुळे या दिवसांत तापमान अधिक थंड होत आहे. कारण ढग उष्णता अडकल्यामुळे आर्द्रता वाढते. 15 ते 16 डिसेंबर दरम्यान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

राज्याचं हवामान कसं राहणार?

16 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव दिसून येणार आहे. सध्या बहुतांश भागात दक्षिण-पूर्वेकडील वारे वाहतायत. येत्या काही दिवसांत उत्तर-मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील बहुतांश भागात रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात आज कसं राहणार हवामान?

स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढच्या 24 तासांत अंदमान-निकोबार बेटावर आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो. 

गुरुवारी पंजाबच्या अनेक भागात दाट धुकं दिसून आलं होतं. त्रिपुरामध्ये मध्यम प्रमाणातील धुकं तर दिल्ली आणि बिहारच्या काही भागात हलकं धुकं होतं. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये 5-10 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.